पिढ्यान पिढ्या वास्तव्यास असलेल्या मच्छीमारावर अन्याय होणार
पैठण, (प्रतिनिधी) नदीकाठी पिढ्यान पिढ्या फळे, भाजीपाला पिकवण्यासह मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कहार समाजांच्या गरीब नागरिकांचे घाट बांधकाम करण्याच्या नावाखाली सोमवारी अतिक्रमण काढण्यात येणार आहे. यामुळे अनेक कुटुंब बेघर होणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, त्यांना पर्याय जागा देण्यात यावी व त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी कहार समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ इछय्या यांनी केली आहे.
विकास योजनेअंतर्गत गोदावरी नदीच्या काठावर राजमाता जिजाऊ घाट बांधण्यास प्रशासनाच्या वतीने २०२२ मध्ये शासना कडून मंजुरी मिळाली असून २०२३ मध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यानंतर सदरील घाट नाथ मंदिराच्या मागील बाजूस बांधण्यात आलेल्या नाथ घाटाच्या दक्षिण बाजूस खेटून करण्याचे नियोजन करण्यात आले होते परंतु या ठिकाणीही काही राजकारणी लोकांनी विरोध केला होता पुन्हा या घाटाची जागा बदलण्यात आली सदर घाट पालखी ओट्याच्या बाजूला करण्याचे निश्चित करण्यात आले होते परंतु या ठिकाणी असलेल्या व पिढ्यानपिढ्या भाजीपाला पिकवणाऱ्या तसेच मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी घाट बांधकामास विरोध केला. तसेच एका महाराजाने राजकीय लोकांना हाताशी धरून घाटाच्या बांधकामास विरोध केला होता.
यानंतर पुन्हा या घाटाची जागा बदलण्यात आली. नगर परिषदेच्या पश्चिम बाजूस सदरील घाटाचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते प्रत्यक्षात घाटाची जागा नेमकी कोणती.
शासनाकडून घाट बांधकामास मंजुरी मिळाले आहे. परंतु घाट नेमका कोणत्या ठिकाणी बांधायचा आहे. हे निश्चित करता आले नाही. सुरुवातीला या घाटाचे काम माले मजिद शेजारी सुरू करण्यात येत होते. जागेची मार्किंग सुद्धा करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी असल्यामुळे या कामास विरोध करण्यात आला.
कामही सुरू करण्यात आले होते परंतु या ठिकाणीही पिढ्यानपिढ्या भाजीपालाचे उत्पन्न घेणाऱ्या व मासेमारी करून आपले कुटुंबाचा उद्धारनिर्वाह करणाऱ्या नागरिकांनी विरोध केला होता. तसेच एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे पुन्हा घाटाचे काम रखडले होते. सदरील लोकांनी या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती जिल्हा सत्र न्यायालयाने सदरील प्रकरण पैठण येथे वर्ग केले.
सदरील प्रकरण पैठण न्यायालयात न्यायप्रविष्ठ असतानाही पैठणच्या तहसीलदारांनी सदरील व्यक्तींना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या ठिकाणी जवळपास ५० ते ६० वर्षाची आंब्याची जांभळाची, सिताफळ, जांबाची झाडे आहेत तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करण्यात आलेली आहे. सदरील प्रकरणी प्रशासन न्यायालयाचा आदर करणार की अनादर करणार याकडे लक्ष लागले आहे.









